Sunday, May 10, 2015

विपश्यना अनुभव

पहिला वहिला ब्लॉग आणि अशा विषयावर ? ध्यान धारणे शी संबंधित काही गहन लिहिलं नहिये:)…. साधे कोर्स विषयीचे  आणि वेग वेगळ्या लोकांना भेटल्यावर काही निवडक अनुभव आले ते लिहिले आहेत.

'विपश्यना मेडीटेशन' चा ११ दिवसाचा कोर्स करायची संधी मिळाली. ऑस्ट्रिया देशातील 'गोट्जिस' या छोट्याश्या गावातील एका शिक्षण संस्थेच्या इमारती मध्ये हा कोर्स असणार होता…. (नाशिक पासून जवळ इगतपुरीला त्यांचं  सगळ्यात पहिलं सेंटर असूनही आपण कोर्स कुठे करायचा तर ऑस्ट्रिया मध्ये.…असो..)

शून्याच्या आस पास तापमान आणि बर्फ पडत असताना सेंटर वर दुपारी २ वाजेपर्यंत पोचलो…संध्याकाळी ६ ला रात्रीचं जेवण आणि मग कोर्स सुरु होणार होता…पुढच्या १० दिवसां आधीचं ते रात्रीचं एकमेव जेवण असणार होतं. 

पोटात भूक आणि डोळ्यां वर झोप असतानाच दुपार च्या वेळात काही नवीन माणसांशी ओळखी पाळखी झाल्या. एक ऑस्ट्रिअन जर्मन माणूस,शरीराने अगदी धष्ट पुष्ट असा छान ओळखीचा झाला. गप्पा झाल्या. अजूनही काही लोकांशी ओळखी झाल्या. संध्याकाळी ६ ला भाज्यांचं सूप आले. जेवणानंतर सर्वांना पुढच्या ११ दिवसांच्या सूचना देण्यात आल्या आणि कोर्स सुरु झाला.

कोर्स ची सारी व्यवस्था ही आधी कोर्स केलेले विद्यार्थीच करतात. त्यामध्ये जेवण बनवण्या पासून पहाटे सगळ्यांना उठवण्या पर्यंत सर्व काही आले. कोर्स कुठलाही धर्म, देव, गुरु यांच्याशी निगडीत नसून त्यात केवळ विपश्यना ही ध्यानाची पद्धत ११ दिवसांमध्ये शिकवली जाते.

पहाटे ४ ला एक टोल वाजवून दिवसाची सुरुवात. ४.३० ला सेशन्स सुरू. सकाळी ६.३० ला नाश्ता. थोडी विश्रांती आणि पुन्हा ८.३० ला सेशन्स सुरु.  ११ ला जेवण, विश्रांती आणि दुपारी १ ला पुन्हा सेशन्स सुरू. ५ वाजता चहा आणि 'फलाहार' (दिवसातला शेवटचा आहार!) आणि पुन्हा ६ वाजता सेशनस सुरू. रात्रीं ९ ला दिवस समाप्त.  ९ ते ९.३० प्रश्नोत्तरं… ऐच्छिक.

रोज संध्याकाळी  एस. एन. गोएंकांचे (ज्यानी हे कोर्सेस सुरु केले) videos दाखवले जातात, ज्यामध्ये ते प्रत्येक  दिवशी आपण काय केलं  आणि केलं ते का केलं याचं स्पष्टीकरण खूप रंजक अशा पद्धतीने गोष्टी सांगत सांगत देतात. दिवसभरात आपल्याला पडलेल्या प्रश्नांचं निरसन या एका तासांमध्ये होऊन जातं. त्यानंतरही काही प्रश्न असल्यास, नेमलेल्या शिक्षकांशी आपण जावून प्रत्यक्ष संवाद साधू शकतो.

दहा दिवस इतर सहभागी झालेल्या व्यक्तींशी काहीही न बोलणे असा नियम (त्याला तिथे 'Noble Silence' अस म्हणतात.) फोन, इलेक्ट्रोनिक्स पहिल्याच दिवशी कोर्स च्या कार्यकर्त्यांकडे सुपूर्त केला असल्याने बाहेर कुठेही संपर्क करण्याचा प्रश्नच नाही. वाचन, लिखाण, गाणी ऐकणं  इ. काहीही करायला परवानगी नाही. खर तर यातलं काहीही करायला वेळच मिळत नाही. केवळ ध्यान, खाणं आणि झोप.

विपश्यना पद्धती आणि एस. एन. गोएंका  त्यांच्या विषयी थोडी माहिती दिल्या शिवाय हा blog पूर्ण होऊ शकणार नाही. 'विपश्यना' म्हणजे गोष्टी खरच जश्या आहेत तश्या बघणे…To see things as they really are. विपश्यना ही ध्यानाची पद्धत भारतात प्राचीन काळा पासून (२५५० वर्षान पूर्वी) गौतम बुद्धांनी शोधून काढली आणि त्याचा प्रसार भारतात आणि आजू बाजूच्या सर्व देशान मध्ये केला. दुर्दैवाने (भारताच्या) बुद्धा  नंतर जवळ जवळ ५०० वर्षांनी ही ध्यान पद्धती भारतातून लुप्त झाली. इतर देशांन मधून सुद्धा त्यातली Purity लयाला गेली. सुदैवाने बर्मा (म्यानमार) देशामध्ये काही शिक्षकांनी ही पद्धत काटेकोरपणे जतन करून ठेवली आणि पुढची २००० वर्षे त्यांच्या पिढ्यान पिढ्या 'विपश्यना' पद्धत आत्मसात करत राहिल्या. 

एस. एन. गोएंका जे बर्मा देशातील औद्यागिक क्षेत्रातील आणि राजकारणातील एक मोठी आसामी म्हणून ओळखले जायचे, अपघातानेच विपश्यना कोर्स ला सामोरे गेले. त्यांना Migraine (डोके दुखी) चा खूप प्रचंड त्रास होता आणि ज्यासाठी ते अमेरिका, जपान, युरोप अश्या सर्व ठिकाणच्या मोठ्या मोठ्या डॉक्टरांकडे औषधे घेत होते. गुण मात्र कुठूनही येत नव्हता. एक शेवटचा उपाय म्हणून त्यांना कोणी तरी विपश्यना कोर्स सुचवला आणि त्यांनी तो पूर्ण केला. त्यांचा Migraine (डोके दुखी) चा त्रास हा खर तर कुठल्या तरी मानसिक  कारणा  मुळे  होता ज्यावर विपश्यने चा चांगला सकारात्मक परिणाम झाला.

त्यानंतर त्यांनी १४ वर्षे त्यांचे गुरु Sayagyi U Ba Khin यांच्या कडे या पद्धतीचा अभ्यास केला आणि शेवटी ते स्वतः शिक्षक म्हणून ती पद्धत बर्मा देशात शिकवायला लागले. Sayagyi U Ba Khin यांचे स्वप्न होते की जिथे हे पद्धत खरी उदयाला आली तिथे म्हणजे भारतात या पद्धतीचे पुनरुजीवन करायचे. दुर्दैवाने त्या काळात बर्मा देशातील नागरिकांना बाहेरच्या देशात जाण्याची परवानगी नसे त्यामुळे त्यांना ते शक्य होऊ शकले नाही. 

योगा योगाने १९६९ मध्ये एस. एन. गोएंका यांचे आई-वडील तेव्हा भारतात होते आणि कुठल्याश्या आजाराने ग्रासले होते. आपला स्वतःचा अनुभव लक्षात घेता गोएंकाजींनी केवळ त्यांच्या साठी भारतात येउन त्यांना विपश्यना  शिकवण्याचे ठरवलं. त्यासाठी पुन्हा त्यांना त्यांचा राजकीय परिचय वापरून भारतात येण्याची परवानगी मिळवावी लागली आणि या निमित्ताने का होईना पण ते भारतात आले. त्यांनी आपल्या आई वडिलां साठी पाहिला कोर्स भारतात घेतला; त्यात अजुनही काही निवडक लोक सहभागी झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या कोर्स चा त्यांच्या आई - वडिलांवर सुद्धा सकारात्मक परिणाम झाला. पुढे जाउन त्यांना काही लोकांनी अजून काही नवीन लोकां साठी कोर्सेस घ्यायची विनंती केली ज्यासाठी गोएंकाजींनी भारतात अजून काही दिवस राहायचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांचे कोर्सेस भारतात अव्याहत पणे चालूच राहिले.

Sayagyi U Ba Khin १९७१ मध्ये निवर्तले; मात्र जाण्याआधी त्यांना आपले स्वप्न पूर्ण झालेले पाहता आले…एस. एन. गोएंकानच्या माध्यमातून.  आज पूर्ण जग भरात वेग वेगळ्या देशांन मध्ये एकूण १६१ विपश्यना केंद्र आहेत जिथे पूर्ण वर्ष वेग- वेगळे कोर्सेस अव्याहतपणे चालू आहेत. असे म्हणतात की हे विधीलिखीत होते की एवढ्या मोठ्या कालावधी नंतर गौतम बुद्धाची शिकवण भारतात पुन्हा परतेल, ज्याला एस. एन. गोएंका निमित्त मात्र ठरले..     

कोर्स च्या दरम्यान अनेक भिन्न प्रवृत्तीचे लोक भेटले..

एक रशियन मुलगा माझ्या समोरच्या बेड वर झोपायचा. नेहेमी चेहेर्या भोवती गोल आकाराची कान टोपी आणि स्वेटर घालून असायचा. तो थोडा चामत्कारिक होता. जिथे इतरां कडे बघणं पण वर्ज्य होतं तिथे हा मुलगा जाणून बुजून सगळ्यां कडे बघून हसायचा. सतत उत्सूक असायचा कि कोणी त्याच्याशी बोलेल. सेशन्स सुरु होण्या आधी हॉल च्या बाहेर सगळे थांबले असताना तो सगळ्यांच्या मध्ये हातावर उभा राहायचा आणि वेग-वेगळे व्यायाम करायचा. बाहेर बर्फ पडत असताना अनवाणी पायांनी बर्फात पाय रुतवत चालायला जायचा.

७ व्या दिवशी रात्री तो न राहवून मी आणि माझ्या बाजूच्या बेड वर झोपणार्या एका ऑस्ट्रिअन मुलाला म्हणाला कि तो बोलणार आहे आणि आम्ही फक्त ऐकायचं आहे. मग तो जेवण कसं अगदी थोडच जेवलं पाहिजे, तो कसा ३ दिवसांपासून २ संत्र्या वर आहे, त्याचं  पोट कसं एकदम सपाट आहे, हे सांगायला लागला. नवव्या दिवशी सकाळी ४ ला बाथ रूम मध्ये येउन त्याने माझ्या टूथ पेस्ट वर लिहिलेला एक शब्द दाखवला आणि म्हणाला कि खर तर या टूथ पेस्ट मध्ये विष आहे.

हे सर्व असूनही…एकन्दरित तो खूप काळजीवाहू आणि छान वाटला. त्याने आधी बरेच वेगळे कोर्सेस केले असावेत कारण तो कोर्स शिकवणार्यांवर पण काही फार खूष नव्हता असं शेवटच्या दिवशी समजलं. शेवटच्या दिवशी त्याने काही संस्कृत शब्द,श्लोक आणि त्याचे अर्थ सांगितले. त्या दिवशी तो बर्याच वेग वेगळ्या लोकां बरोबर बरीच चर्चा करताना दिसला. चर्चा म्हणजे तो बोलत होता आणि बाकी ऐकत होते. तो म्हणाला होता, सारं काही करून शेवटी त्याला भारतात यायचय.  भारताकडे  आणि मुख्यत्वे हिमालयाकडे आकर्षित करणारी स्पंदनं त्याला जाणवतात असं त्याला वाटत होतं.

पहिल्या दिवशी ओळख झालेला धष्ट पुष्ट जर्मन माणूस ६ व्या दिवशी सोडून गेला. त्याला जाताना पाहून काहीच बोलता आलं  नाही. एक ब्रिटीश मुलगा दुर्दैवाने २ र्या दिवशी बरफावरून पाय घसरून पडला आणि त्याच्या हाताला सूज आली. बाहेर हवामान खूपच वाईट असल्याने त्याला डॉक्टर कडे घेऊन जाता आलं  नाही. पुढचे सारे दिवस तो दुखावलेला हात दुसर्या हातात घेऊन बसला, सुजलेल्या हातावर होणाऱ्या असह्य वेदने सकट. पण कोर्स  मध्येच सोडून गेला नाही.

एक क्रोएशिया मधली मुलगी आणि स्लोवेनिया मधला मुलगा असं कपल भेटलं. शेवटच्या दिवशी बोलताना  विषय निघाला आणि ती मुलगी आमिर खान च्या पिक्चर्स ची खूप मोठी चाहती निघाली. त्याच्या सोशल मेसेजेस देणाऱ्या सार्या मुव्हीज तिला पाठ होत्या. मुख्य करून '३ Idiots', 'तारे जमीन पर' आणि 'रंग दे बसंती'. तिला एकूणच त्याच्या विषयी खूप आदर आणि उत्सुकता होती. तिने 'पिके'आणि 'सत्य मेव जयते' ची माहिती पण लिहून घेतली.

एकूणच १० व्या दिवशी सकाळी जेव्हा सर्वांना एक मेकांशी बोलायची मूभा मिळाली, तेव्हा प्रत्येकाला अनोळखी माणसांशी पण खूप बोलायचं होतं. १०० एक जणान मध्ये मी एकटाच संपूर्ण भारतीय असल्याचं  जाणवल्याने सगळे जण येउन विचारायाचे की ज्या देशात हे सगळं आहे तिथून मी एवढा लांब इथे कोर्स करायला कसा काय आलो. मग इथे कामानिमित्त आलो आहे सांगितल्यावर त्यांचे काही तरी चुकल्या सारखे झालेले भाव पूर्ववत व्हायचे. त्यातले खूप जण भारतात येउन गेले होते आणि जे आले नव्हते त्यांना भारता विषयी खूप उत्सुकता होती आणि भविष्यात कधीतरी भेट देण्याची इच्छा होती. एक जण म्हणाले भारतात तर सगळेच समाधानी असतील नाही? नकारार्थी उत्तर दिल्या वर ते आश्चर्याने म्हणाले…."का तिथे सगळेच ध्यान करतात ना ??"

एक  १९-२० वर्षांचा मुलगा भेटला. 'गेम ऑफ थ्रोन्स' सारख्या सिरीअल मध्ये कुठल्याही राजपुत्राची भूमिका मिळू शकेल असा दिसायला राजबिंडा होता.  त्याने गर्वाने सांगितलं  की तो भारतात अनेक वेळा आणि अनेक महिने राहून आला होता, राजस्थानच्या कुठल्याश्या  भागा मध्ये. पुढचा प्रश्न त्याने मला विचारला, मी कुठल्या जातीचा आहे? राजपूत, ब्राम्हण की अजून काही? मी मला नक्की माहीत नाही सांगितल्यावर तो म्हणाला की मला सांगायचं  नाहीये म्हणून मी असं बोलतोय. मग मी सरकार मान्य विभाजना नुसार OBC मध्ये आहे असं सांगितल्यावर त्याने मनात काही तरी गणित केलं  आणि मला sorry  म्हणाला. भारतात दुर्दैवाने कुठल्या आत्म्यांबरोबर तो राहिला असावा त्याचं त्यालाच माहीत.

माझ्या बाजूच्या बेड वर झोपणारा अजून एक ऑस्ट्रिअन मुलगा मला १० व्या दिवशी चहा साठी बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला भारताविषयी थोडं  सांग  काहीतरी…. अगदी काहीही! तो १० दिवस खूप प्रसन्न होता. बोलताना छान  बोलला. म्हणाला, बरेच लोकं बोलायचं नाही म्हंटल्यावर १० दिवस एवढे nervous का होते? आपण फक्त बोलतच तर नव्हतो ना but we were not dead right?

एक आफ्रिकन माणूस भेटला जो दिसायला अगदी मोर्गन फ्रीमन किव्वा कोफी अन्नान सारखा होता.  त्याला तसं सांगितल्यावर त्याने त्यांचे फोटो पण खिशातून काढून दाखवले, म्हणाला सगळेच जण भेटल्यावर त्याला तशी compliment देतात. तो जवळच राहात होता, त्यांच्या typical  बोलण्याच्या पद्धतीने त्याने coffee  साठी येण्याचा खूप आग्रह केला. छान वाटलं.

एक ऑस्ट्रिअन माणूस खूप वेळा कंपनीच्या कामा निमित्त भारतात जाऊन आला होता. भारतात जयपूर मध्ये त्याने अगदी अपघातानेच पहिला कोर्स केला होता आणि त्या नंतर दर वर्षी एक तरी कोर्स करतच गेला. त्याच्या मते जयपूर चं सेंटर हे जगातलं बेस्ट सेंटर होतं. विपश्यना कोर्स चा एक अलिखित नियम असा असतो की एक कोर्स करून झाला की पुढचा कोर्स करण्या आधी मध्ये एका कोर्स मध्ये service (कार्यकर्ता म्हणून करता येईल ते काम ) करावी. तसच ११ दिवसान पेक्षा मोठे कोर्सेस करायचे असल्यास, service चा काही अनुभव गरजेचा असतो. एक UK मध्ये स्थायिक झालेला भारतीय माणूस पण भेटला. त्याने  अनेक वेळा कोर्स केला होत. गप्पा मारताना तो म्हणाला, "मी जर यांनी service चा नियम काढून टाकला तर, २०-२५ दिवसांचे ध्यानाचे कोर्स करायला पण तयार आहे". जयपूर वाला ऑस्ट्रिअन माणूस शांत पणे ऐकत होता. पुढच्या काही वाक्यात त्याने service केल्या शिवाय मोठे कोर्सेस करणं कसं  निरर्थक आहे आणि केवळ ध्यान करायला मिळणं हा स्वार्थी हेतू  कसा नसावा हे मांडलं. ब्रिटीश-भारतीय माणसाला त्यावर काय बोलावं समजलं नाही.

परतीच्या वाटेवर अजून एका ऑस्ट्रिअन मुला बरोबर एकत्र आल्याने खूप छान गप्पा  झाल्या. Commercial Artist  असलेला हा मुलगा भारतात अनेक वेळा येउन गेला होता. नुकतीच त्याने 'चंदिगड' शहरावर एक documentary बनवली होती. एकूणच तो भारतावर फिदा होता आणि आपल्या बारीक सारीक गोष्टी पण त्याने छान आत्मसात केल्या होत्या. त्याच्या फोन वर Wall Paper हा चहा वाल्याकडे मिळणाऱ्या कटिंग च्या ग्लास चा होता. त्याने माझ्याकडे चौकशी केली की, रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणारे ज्योतिशी भारतात नक्की कुठे भेटतील. त्याची कल्पना अशी होती की, त्या पोपटा कडून काही रंगांच्या चिठ्ठ्या randomly निवडून घ्यायच्या आणि पोपटाने निवडलेल्या रंगांचा वापर करून एक abstract painting तयार कारायचे. या सगळ्याचा एक non-stop video तयार करायचा. त्याच्या मते ज्योतिष्याचा पोपट हा त्याच्या painting  साठी रंग निवडून देणारा एक 'Random Oracle Model' वर आधारित असा program होता. How Artistic & Creative!

१० दिवस शांत दिसणारी लोकं आणि ११ व्या दिवशी बोलणारी लोकं, खूप वेगळी जाणवली. काही जण हपापल्या सारखे बोलत होते. काही जण तसच शांत राहून जेवढे हवे तेवढेच बोलत होते.

एकंदरीत परदेशात नॉर्मल कामानिमित्त/फिरायला गेल्यावर भेटणारी लोकं आणि हे लोकं, त्यांचा भारतीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन आणि आपल्याला दिली जाणारी वागणूक  यामध्ये प्रचंड तफावत जाणवली. इतर लोक आपल्याला 'underestimate' करताहेत का ही लोकं 'overestimate'  करताहेत हे कोडच वाटलं.

११ दिवसांनी परत आलो तर २०१५ उजाडल होतं. येताना ट्रेन च्या प्रवासा मध्ये बर्फाच्छदित डोंगर रांगा तशाच सुंदर भासल्या. त्याच दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर २ नवीन flat-mates भेटले. दुसर्या दिवशी ऑफिस मध्ये  सुट्ट्या संपवून सगळे जण ऑफिस ला परत आले होते.

एकच वैशिष्ट्य पूर्ण गोष्ट या काळात घडली होती, एम. एस. धोनी  टेस्ट क्रिकेट मधून अचानकपणे निवृत्त झाला होता. बाकी सारं छान चालू होतं.

एकूणच, आपण ११ दिवस नसल्याने जगाला फार काही फरक पडला नव्हता :-)


- शैलेश

काही महत्वाच्या लिंक्स :

  • विपश्यना कोर्सेस विषयी माहिती साठी - http://www.dhamma.org 
  • एस. एन . गोएंकांनी विपश्यना शी करून दिलेली ओळख : https://www.youtube.com/watch?v=UpOjoECbfJE
  • Doing Time Doing Vipassana : तिहार जेल मध्ये कैद्यांसाठी किरण बेदींनी विपश्यना कोर्सेस चे केलेले प्रयोग आणि त्याचे परिणाम यावर एक फिल्म; https://www.youtube.com/watch?v=WkxSyv5R1sg
  • एस. एन . गोएंका यांचं  World Peace Summit मधील प्रसिद्ध भाषण : https://www.youtube.com/watch?v=P97criit1qI